Dr Sachin Landge's Writing

Dr Sachin Landge's Writings

“सोनू, तुला भरोसा नाय काय ?”

सोनू च्या घरी गणपती आला. त्याने मनोभावे पूजा केली,
मित्रांना, नातेवाईकांना घरी बोलावले,
प्रसाद दिला. सण चांगला साजरा केला.
त्यानंतर तो दगडूशेठ चे दर्शन घेण्यासाठी गेला.. धक्के खात कसे तरी दगडूशेठ गणपती चे दर्शन घेतले..
आणि थकून भागून घरी आला …
तेव्हा घरचा गणपती त्याला म्हणाला ..
“सोनू, तुला माझ्यावर भरोसा नाय काय ?”
सोनू लाजला, पण बदलला नाही..
अहो, मंडळातल्या गणपती समोर अश्लील गाणी ऐकताना सोनूचा धर्म बुडत नाय.. पण पालिकेच्या हौदात मूर्ती विसर्जित कर म्हणलं की त्याचा धर्म बुडतो..
सोनू, तुला आपल्या धर्मावर भरोसा नाय काय?
मिरवणुकीत हिडीस नाचताना सोनूची संस्कृती बुडत नाय, पण शाडूची मूर्ती आणि इकोफ्रेंडली आरास कर म्हणलं की त्याची संस्कृती बुडते, आणि तो ‘तुम्ही फक्त हिंदूंच्याच सणांवर टीका करता’ म्हणून कांगावा करू लागतो..
सोनू , तुला आपल्या संस्कृती वर भरोसा नाय काय?
गणपतीसमोर दारू ढोसताना सोनूला संस्कार आठवत नाय, पण पोकळ दिखाव्यापेक्षा साधेपणानं सण साजरा कर म्हणलं की सोनूला अपमान वाटतो..
सोनू, तुला आपल्या परंपरेवर भरोसा नाय काय?
दांडगाईनं वर्गणी मागताना, दर्शनाला आलेल्या पोरींशी लोचट रेटारेटी करताना, रहदारीला अडथळा करताना, डीजेच्या आवाजानं दुसऱ्यांचे कान फाडताना, सोनूला जराही लाज वाटत नाही, पण ‘एक गाव एक गणपती’ बसव म्हणलं की सोनूच्या भावना दुखावतात.. आणि मग सोनू ‘जरा मुस्लिमांना पण शिकवा की’ म्हणतो, आणि स्वतःच्याच सणांच्या विद्रुपीकरणाचं निर्लज्ज समर्थन करतो..
सोनू, तुझा बुध्दीच्या देवतेवर भरोसा नाय काय?
असो… मित्रांनो, दहा दिवस मोक्कार मिजाशीत वाया घालविणाऱ्या सोनूला बुद्धीच्या देवतेची कितीही उपासना केली तरी अजिबातच अक्कल येणार नाहिये..
कारण, सोनूचा स्वतःवरच भरोसा नाय!!
.. आणि जर हे वाचून तुमच्यातलाही सुप्त सोनू बदलणार नसेल, तर तुमचाही तुमच्या अकलेवर भरोसा नाय..!!
बरोबर ना? हाय काय अन नाय काय..
बोला, गणपती बाप्पा मोरया!!!

मित्रांसोबत शेअर करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *