Dr Sachin Landge's Writing

Dr Sachin Landge's Writings

पालकत्वाच्या नोंदी भाग ३

“माझं अमुक काम कर, मी तुला चॉकलेट देईन”, किंवा, “तू एवढा अभ्यास कम्पलिट केलास तर मग मी तुला जास्त वेळ खेळू देईन” , अशी आमिषे दाखवायचे फालतू प्रकार तर मी कधीच केले नाहीत..
चॉकलेट/कॅडबरी कधीमधी मुक्ताला घेऊन दिलीय.. पण सहजच.. कुठलं आमिष, किंवा कशाचं बक्षीस म्हणून नव्हे.. तसंच, मुलांना खेळू द्यायचं, ते अभ्यास केल्याचं बक्षीस म्हणून नव्हे.. उलट खेळणं हा त्याचा हक्क आहे.. पण त्याचबरोबर, जसं खेळणं गरजेचं आहे, तसंच अभ्यासही गरजेचा आहे, हेही मुलांना कळेल असा प्रयत्न आपण केला पाहिजे..
मुलांना भरपूर प्रोत्साहन मिळणं त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गरजेचं असतं, पण ते प्रोत्साहन त्यांनी कुठल्या वस्तूत किंवा कसल्या भौतिक अमिषात शोधू नये, यासाठी आपण जाणीवपूर्वक सजग राहिलं पाहिजे..
आमची शाबासकी किंवा आमचे कौतुकाचे शब्द हेच मुक्ताचं बक्षीस राहिलंय, अगदी पहिल्यापासून.. तिला कुठल्या गोष्टीत, वस्तूत किंवा खाऊत कधी कुठलं बक्षिस शोधू दिलं नाही..
त्यामुळं चांगलं वागायचं असतं, अभ्यास करायचा असतो, ते केवळ Good habits म्हणून.. कुठलं बक्षीस, चॉकलेट, किंवा गिफ्ट मिळविण्यासाठी नाही, हे तिला पहिल्यापासून माहिती आहे..
मुलांनी सकाळी उठून स्कुलसाठी रेडी होणे, रोजचा होमवर्क शक्यतो त्याच दिवशी पूर्ण करणे, जेवण वेळेवर आणि पूर्ण करणे, या पालकांच्या नाही, तर मुलांच्या जबाबदाऱ्या आहेत.. आणि , कुठलीही गोष्ट करायची तर ती केवळ आम्ही म्हणतो म्हणून नव्हे, (किंवा त्या बदल्यात काही वस्तू किंवा कुठली मुभा मिळतेय म्हणून नव्हे,) तर ‘ती चांगली असते म्हणून करायची’, असाच आशय तिच्या मनावर ठसविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न आम्ही पहिल्यापासून केलाय.. म्हणजे अमुक एक गोष्ट करून किंवा आम्ही म्हणतोय असं वागून तू आमच्यावर उपकार करत नाहीयेस, तर ते करणं किंवा तसं वागणं हे तुझ्याच भल्यासाठी आहे, त्याबद्दल तुला आयुष्याकडूनच गिफ्ट मिळणार आहे, आम्ही गिफ्ट देणारे कोण? असाच आमचा सूर राहिलाय..
अर्थात, हे इतकं समजण्याचं लहान मुलांचं वय नसतं. पण आपण छोट्या मोठ्या प्रसंगातून, उदाहरणातून, गोष्टींतून यातला आशय वेळोवेळी मुलांच्या मनावर ठसवू शकतो, आपल्या वागण्याबोलण्यातून जाणवून देऊ शकतो.. पहिल्या इयत्तेपासूनच ही समज यावी असं काही नाही, पण कधी माफ करून, कधी हट्ट पुरवून, कधी थोडं त्यांच्या कलाने घेऊन, मुलांना ‘विद्यार्थी’ म्हणून आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत, ते लवकरात लवकर समजणं गरजेचं आहे..
खरंतर आपण आपल्या ‘कम्फर्ट’साठी मुलांना अमिषांची चटक लावत असतो.. आपल्याला आपल्या कामात त्यांची लुडबुड नको असते म्हणून मग आपण त्यांना ‘कार्टून नेटवर्क’ लावून देतो.. मुलं आपल्याला निवांत लोळू देत नाहीत, म्हणून मग आपण त्यांच्या हातात चॉकलेट/वेफर्स देतो.. मुलं रडतात म्हणून त्यांना नादी लावण्यासाठी आपण त्यांच्या हातात मोबाईल देतो, मग नंतर मुलं त्या त्या गोष्टींसाठी हट्ट करतात.. कार्टून बघू दे, जेवणाऐवजी चिप्सच खाऊ दे, खेळायला ‘मोबाईल दे’ म्हणून रडतात..
काही गोष्टी (किंवा मुभा) देण्यासाठी नियम बनवायचे पण काही गोष्टी नाही म्हणजे नाहीच द्यायच्या किंवा नाहीच करायच्या.. मी एका मित्राच्या घरी गेलेलो, थोड्या वेळाने त्याचा मुलगा आला आणि म्हणाला, पप्पा तुम्ही म्हणल्याप्रमाणे मी एक तास अभ्यास केलाय आता मला मोबाईलवर गेम खेळू द्या..
मी मित्राला म्हणालो, “पहिली गोष्ट म्हणजे, आता तुझा मुलगा सातवीत आहे, तेंव्हा केवळ तू सांगितलंय म्हणून (किंवा तुझ्यावर उपकार म्हणून!) त्यानं अभ्यास करणं, असं अपेक्षित नाही.. त्याची त्यालाच अजूनही याची समज आली (किंवा आणली) नाही, ही यातली पहिली चूक.. आणि दुसरं म्हणजे, ‘एक तास अभ्यास केलाय’, हे काही एक्सक्युज नाही होऊ शकत!.. त्याने एक तास अभ्यास करू देत नाहीतर दहा तास करू देत.. ‘मोबाईल गेम’ नाही म्हणजे नाही!!..
आज त्याचं मोबाईल गेम वर भागतंय, पण अशीच illogical excuses शोधायची सवय लागली तर उद्या मोठं झाल्यावर म्हणेल, ‘ऑफिसमध्ये मी एवढं मरमर काम करतो म्हणून मी थोडेसे ड्रग्ज घेतले तर काय बिघडलं?’.. असं झालं तर चालेल का तुला?”
मित्राच्या चेहऱ्यावर हेल्पलेस भाव होते.. एरवी कामाच्या ठिकाणी परफेक्ट डिसीजन्स घेण्यासाठी फेमस असणारा मित्र पालकत्वाच्या बाबतीत मात्र गोंधळलेला होता.. असो..
मुलांनी करायच्या किंवा न करायच्या गोष्टींची absolute आणि relative अशी वर्गवारी करायची.. कोणत्याही आणि कुठल्याही परिस्थितीत absolutely contraindicated गोष्टी त्यांना (स्वतःची समज किंवा तारतम्य येईपर्यंत तरी) अजिबातच करू द्यायच्या नाहीत.. आणि relatively contraindicated गोष्टी करताना, आपण ही सवलत ‘का आणि कुठल्या परिस्थितीत’ देत आहोत, हे त्यांना स्पष्टपणे कळू द्यायचं..
(क्रमशः)

मित्रांसोबत शेअर करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *