Dr Sachin Landge's Writing

Dr Sachin Landge's Writings

पक्षनिष्ठा

आपण सहलीला जाताना आपली गाडी चालवायला ड्रायव्हर घेतो..

तेंव्हा,

तो गाडी व्यवस्थित चालवितो का, व ड्रायव्हिंगसाठी तो सर्व दृष्टीने सक्षम आहे का हे पाहून घेतो, की केवळ तो आपल्या जातीचा/धर्माचा आहे म्हणून त्याला निवडतो..?

तो गाडी चालवीत असताना त्याच्या ड्रायव्हिंगमधल्या चूका त्याच्या निदर्शनास आणून देतो, की मग त्याने कशीही चालवू देत गाडी (आपलाच माणूस आहे) म्हणून डोळेझाक करतो..?

तो जर कधीमधी अंदाधुंद चालवू लागला तर आपण त्याला खडसावतो का?, की “वा! काय मजा येतीय” म्हणून आपल्याला आनंदाच्या उकळ्या फुटतात..

तो वाहतुकीचे नियम, लेन, शिस्त पाळत नसेल, म्हणून आपल्याच् गाडीतल्या एखाद्या प्रवाशाने त्याला समज दिली तर आपल्याला त्या सहप्रवाशाचा त्याचा राग येतो, की आपणही ड्रायव्हरला व्यवस्थित गाडी चालविण्याविषयी सूचना करतो..?

समजा, आपला ड्रायव्हर पूर्वीच्या दुसऱ्या ड्रायव्हरची निंदानालस्ती करत असेल, सारखा अपमानास्पद बोलत असेल, तर आपल्याला आपल्या ड्रायव्हरचा अभिमान वाटतो की त्याची कीव करावी वाटते..?

समजा, आपला सहप्रवासी आपल्या ड्रायव्हरच्या ड्रायव्हिंगमधील छोट्यामोठ्या चुका दाखवून देत असेल आणि त्या सुधारण्याविषयी सूचना करत असेल,
तर आपण काय करतो?

  1. सहप्रवाशाच्या वस्कन अंगावर जातो..
  2. तुला ड्रायव्हरच्या चुकाच फक्त दिसतात, त्याने मघाशी किती छान कट मारला त्याचे कौतुक कर की म्हणून ड्रायव्हरची वकिली करतो..
  3. सहप्रवाशाला दुसऱ्या गाडीत जा म्हणून सांगतो..
  4. ‘माझ्याच ड्रायव्हरच्या चूका का काढतो, आधीच्या ड्रायव्हर बद्दल बोल की’ म्हणून चिडतो..
  5. की आपली एक झुंड तयार करून त्या सहप्रवाशाला जीवे मारून टाकतो?

अशा अनेक प्रसंगात आपण काय करतो, याबाबत आपली सर्वांची मतं जवळपास एकसारखीच् येतील..

पण मग आपला देश चालवायला दिलेल्या ड्रायव्हरच्या बाबतीत मात्र आपण इतके हळवे का होतो..?

आपल्या या देशाच्या प्रवासात आपण निवडून दिलेलं सरकार म्हणजे आपण देश चालवायला दिलेला ड्रायव्हर असते..

त्यांच्या प्रत्येक निर्णयात आपले, आपल्या सहप्रवाशांचे, आपल्या पुढच्या पिढीचे आणि परिणामी आपल्या देशाचे भवितव्य ठरलेले असते..

त्यांच्या निर्णयांची, निरनिराळ्या धोरणांची व त्याच्या बऱ्यावाईट परिणामांची चर्चा करणे आपले कर्तव्य असते.. त्यात आपण वाईट वाटून घेण्यासारखे किंवा पर्सनली घेण्यासारखे काहीच नसते..

आपला एखादा सहप्रवासी ड्रायव्हरच्या चुका काढत असेल (सरकारवर टीका करत असेल) तर त्याला दुसऱ्या गाडीत बस (किंवा पाकिस्तानात जा) असे सांगणे, हे तर निव्वळ मूर्खपणाचे लक्षण आहे..

एखाद्या सहप्रवाश्याने जरी तो ड्रायव्हर नेमला नसेल (त्या सरकारला मत दिले नसेल) तरी तो त्या गाडीत बसला तर आहे..! ड्रायव्हर जे गाडीचं (देशाचं) बरं वाईट करेल त्यावर त्याचंही बरंवाईट अवलंबून असते.. म्हणून ड्रायव्हरला बोलायचा त्यालाही तेवढाच हक्क आहे.. एवढं तरी आपल्याला कळायला हवं ना..?
तेंव्हा झुंडशाही किंवा कंपू करून उगीच ट्रोल करण्याला किंवा ड्रायव्हिंगला नावे ठेवणारा सहप्रवासी संपविण्याला काय अर्थ आहे??

आपल्या ड्रायव्हरने गाडी चालविणे सोडून भलत्याच गोष्टी केल्या, बाता मारल्या, निरर्थक गोष्टींना महत्त्व दिले, वेगळेच अजेंडे रेटले.. तरीपण त्याच्याकडे कानाडोळा करणे, व माझाच ड्रायव्हर चांगला म्हणणे, आणि वर “मग तुम्ही दाखवून द्या दुसरा एखादा ह्या लायकीचा ड्रायव्हर” असं म्हणणे हे तद्दन ड्रायव्हरभक्तीचे लक्षण आहे, सुजाण प्रवाशाचे नाही..

जर आपल्याला हाच ड्रायव्हर लॉंग टर्म साठी हवा असेल तर तो सर्वमान्य कसा होईल, तो इतर सहप्रवाशांचेपण मन कसे जिंकून घेईल हे पाहण्यातच शहाणपण आहे.. ना की त्याची अंधभक्ती करण्यात..

असो..

मित्रांनो,
तुम्ही ठरवा आपला देश चालवायला ज्यांच्या हातात दिलाय त्यांच्यावर वचक ठेवून आपल्या देशाची गाडी योग्य दिशेने न्यायची की फक्त ड्रायव्हर-ड्रायव्हरच् खेळायचेय..

।। जय हिंद ।।

मित्रांसोबत शेअर करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *