मैत्री..
मैत्री दिनाच्या शुभेच्छा देणारे खूप मेसेज आले सकाळी सकाळी..
मग मला पूर्वी व्हाट्सएपवर आलेला एक जोक आठवला..
नवरा बायकोत मित्रांवरून भांडण होते. बायको म्हणते तुमचे मित्र बिनकामाचे आहेत, एकपण धड नाही..
मग नवरा म्हणतो, चल टेस्ट करू..
तो बायकोच्या पाच मैत्रिणींना फोन करतो, आणि प्रत्येकीला विचारतो, “आमची ही रात्रीपासून घरी आली नाही, कुठे गेली काही माहिती आहे का?” त्या पाचही जणी काळजी व्यक्त करून नाही म्हणतात..
मग ती बायको त्याच्या दहा मित्रांना फोन करून विचारते, “आमचे हे रात्रीपासून घरी आले नाहीत, कुठे आहेत काही पत्ता आहे का?” तर दहातले पाचजण म्हणतात, “हो वहिनी, रात्री इथेच होता, आत्ताच गेलाय”.. चारजण म्हणतात, “हो वहिनी, बाथरूममध्ये गेलाय, त्याला पाच मिनिटांनी फोन करायला सांगतो”.. आणि एकजण म्हणतो, “बोल गं, मीच बोलतोय, काय काम आहे?”
तर अशी असते मैत्री..
आपले अनेक प्रकारचे मित्र असतात.. शाळेत झालेले, ट्युशन मुळे झालेले, कॉलेजमध्ये एकच पोरगी आवडत असल्यामुळे झालेले, खेळामुळे झालेले, नंतर व्यवसायामुळे झालेले, ट्रिप-ट्रेकिंग मुळे झालेले, भिशीमुळे झालेले, समान छंदांमुळे झालेले.. असे अनेक..
आणि हे सगळे आपल्या आयुष्यात महत्वाचे असतात..
हे आपले स्ट्रेस बस्टर असतात..
ज्यांच्यासोबत आपण त्या त्या गोष्टी (कला/खेळ/म्युझिक/ट्रेक) शेअर करून आनंद मिळवू शकतो, स्वतःची स्ट्रेस लेव्हल कमी करू शकतो..
पण हेच “जवळचे मित्र” असतील असं नाही..
जवळच्या मित्राची व्याख्याच वेगळी आहे..
भलेही तुमच्यात आणि त्याच्यात काहीच साम्य नसो,
भलेही तुमचे बरेच गुण आणि छंद जुळत असोत वा नसोत..
पण,
- ज्याच्यासोबत असल्यावर तुम्ही खूप कम्फर्टेबल असता, तो तुमचा अत्यंत जवळचा मित्र असतो..
- ‘तो याचा गैरवापर तर करणार नाही ना’ अशी शंका मनात पण येऊ न देता, ज्याच्यासोबत तुम्ही तुमचे डर्टीयेस्ट सिक्रेट्स शेअर करू शकता, तो तुमचा अत्यंत जवळचा मित्र असतो..
- ‘त्याला काय वाटेल’ याचा विचार न करता, ज्याला तुम्ही तुमच्या वाईल्ड फॅन्टसीज सांगू शकता, तो तुमचा सर्वात जवळचा मित्र असतो..
- जो तुमचा पहिला पेग लार्ज भरतो, आणि चारपाच पेगनंतर थम्सअपच जास्त टाकायला लागतो, तो तुमचा खरा मित्र असतो..
- जो तुम्ही उलट्या करताना ‘काढ सगळं पोटातलं’ म्हणत पाणी घेऊन उभा असतो, तो तुमचा खरा मित्र असतो..
- ज्याला तुम्ही कितीही शिव्या घातल्या तरी, ‘सॉरी’ म्हणल्यावर लगेच नॉर्मल होतो, तो तुमचा खरा मित्र असतो..
- ज्याला अत्यंत गरजेच्या वेळी पैसे उसने मागितल्यावर स्वतःला शक्य नसले तरी, जो दहा जणांकडून उसने घेऊन तुम्हाला देतो, तो तुमचा जवळचा मित्र असतो..
- तुम्ही बाहेरच्या जगात कितीही सभ्य असा, ज्याच्यासोबत असताना तुम्ही पद/प्रतिष्ठा/पैसा/स्टेटस यांपैकी कसलाच विचार न करता ‘ओपन अप’ होता, तो तुमचा अत्यंत जवळचा मित्र असतो..
तुम्ही जवळ असा अथवा दूर असा, रोज बोलावंच असं नाही..
रोज किंवा आठवड्याला फोन करून शेअर करावंच असं नाही..
… उलट सहा महिन्यानंतर जरी फोन केला तरी, मागं जिथं संभाषण संपलं होतं तिथून सुरू व्हायला हवं..
वयानुसार आणि परिपक्वते नुसार मैत्रीपण “फ्लो” झाली पाहिजे..
तू मला वाढदिवसाला ‘विश’च नाही केलं..
तू माझ्या पोस्टला लाईकच नाही केलं..
तू पिक्चरला चाललाय हे मला का नाही सांगितलं.. तू ट्रिपला मला नाही नेलं.. माझा काका वारल्यावर तू फोनच नाही केला..
तू माझ्या मेसेजला रिप्लायच नाही दिला.. मीच फोन करतो, तू स्वतःहून फोनच करत नाही..
असल्या तक्रारी जशी मॅच्युरिटी वाढेल तश्या गळून पडायला हव्यात.. तरंच मैत्री “फ्लो” होते.. नाहीतर “साचलेलं डबकं” होते, किंवा “गळेपडू ओझं” तरी होते..
एकमेकांच्या वैयक्तिक आयुष्यात अति ढवळाढवळ न करता, जेव्हा गरज लागेल तेव्हा “मी आहे तुझ्याबरोबर” अशी शाश्वती दोघानाही पाहिजे, आणि मतभेदांमध्ये सुद्धा एकमेकांचा आदर राखता आला पाहिजे..
काहीजण मित्राला म्हणतात, “का रे, गरज पडली की च आमच्याकडे येतो का?” पण उलट मी म्हणत असतो, “गरज पडली की पहिली माझी आठवण यायला हवी तुला”..
तुझ्यासाठी कधीपण कायपण कुठेपण ..
मेरे दिल की ये दुवा हैं, कभी दूर तू ना जाये..
तेरे बिना हो जीना, वो दिन कभी ना आये..
तेरे संग जीना यहाँ, तेरे संग मर जाना..
याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना..
तेरे जैसा यार कहाँ, कहॉं ऐसा याराना…