ज्या गोष्टी आपल्याला जन्मतः चिकटतात त्यात कसला माज बाळगतात लोक काय माहिती? जातीचा माज किंवा धर्माचा माज यात त्या व्यक्तीचं स्वतःचं कर्तृत्व ते काय असतं बरं? कशाचा पण माज! काय तर म्हणे ‘मी मराठी’ असल्याचा माज! इतर अनेक भाषांसारखीच ही एक भाषा आहे. तिची वैभवसंपन्नता किंवा तिचा लहेजा यांचा अभिमान असलेला एकवेळ ठीक आहे, पण माज? माजण्यासारखं काय आहे त्यात! आणि तुझं कर्तृत्व ते काय आहे त्यात?
अर्धवट विचार, कुपोषित बुद्धिमत्ता आणि सांस्कृतिक शीघ्रपतनातून आलेली नपुंसकता लपविण्यासाठी ही असली माजाची स्वप्ने दाखवली जातात.. आणि बौद्धिक षंढ लोक त्याला बळी पडतात..
जी केवळ आपल्याला त्यात जन्म मिळाला म्हणून आपल्याला चिकटलीये त्या जातीचा माज, धर्माचा माज, भाषेचा माज, संस्कृतीचा माज बाळगणे म्हणजे निव्वळ टुकार मानसिकतेचे लक्षण आहे.. त्यासोबतच भगवे/निळे/हिरवे/पिवळे झेंडे घेऊन फोटो काढणारे लोक हे सगळे त्याच माळेतले मनी असतात..
आपल्याला कशाच्या सोबत फोटो काढून मिरवावा वाटतो यात आपला माईंडसेट (मानसिकता) आणि आपल्या प्रायोरीटीज (प्राथमिकता) दडलेल्या असतात..
खूप साऱ्या लोकांना पुस्तकांबरोबर फोटो का नाही काढावा वाटत? सायन्सशी संबंधित किंवा आपल्या शिक्षणाशी संबंधित प्रतीके backgroundला का वापरावी वाटत नाहीत.?
लोकांना तलवारीसोबत, तोफेसोबत किंवा झेंडा, फेटा यासोबत फोटो काढावा वाटणे ही त्यांची मध्ययुगीन मानसिकता दर्शवते. तर श्रीमंतीचे प्रदर्शन करणाऱ्या गोष्टी जसं की, बीएमडब्लू , बुलेट किंवा दागदागिने यासोबत फोटो काढावे वाटणे हे त्यांच्या प्रायोरीटीज दर्शविते.., ते कशाला importance कळत नकळतपणे देतात ते कळते..
सणासुदीच्या निमित्ताने असं नटूथटू वाटणे साहजिकच आहे आणि ते आपण समजू शकतो, पण एरवीही आपल्या वागण्यात सारखंसारखं हे येत असेल, तर त्या व्यक्तीने आपण धार्मिक/जातीयवादी/मध्ययुगीन मागास किंवा इतर काय आहोत का, ते तपासून घ्यावे..
आपण स्वकर्तृत्वाने मिळवलेल्या अत्यंत आवडत्या गोष्टीचा अभिमान बाळगा की हवा तेवढा, पण हे ‘माज’णे वगैरे कसं जस्टीफाय करता येईल बरं? कुठल्याही गोष्टीचा माज बाळगणे चूकच आहे.. एवढीच हौस आहे तुम्हाला ‘माज’ण्याची, तर ‘माज आहे मला फिजिक्सचा’ म्हणा की!, ‘माज आहे मला मी मॅथेमॅटीशीयन असल्याचा’ म्हणा बरं.. हे का सुचत नाही?
कुपोषण बुद्धिमत्ता आणि मध्ययुगीन मानसिकता दाखविण्याचे एवढे डोहाळे का लागावेत बरं आपल्या मेंदूला?!!
– डॉ सचिन लांडगे.