Dr Sachin Landge's Writing

Dr Sachin Landge's Writings

लैंगिकतेतली सहजता आणि स्त्री पुरुष..

एकतर आपल्याकडं बऱ्याच भारतीय पुरुषांना ‘लाईट फ्लर्ट’ अगदी कॅज्युअली करता येत नाही.. आणि, समोरच्या स्त्रीने केलेला लाईट फ्लर्ट पण कॅज्युअली (आणि स्पोर्टिंगली) घेता येत नाही.. मग त्यामुळे भारतीय स्त्रिया त्या भानगडीत पडत नाहीत..
.. आणि बहुतांश स्त्रियांना अशा ‘लाईट फ्लर्ट’ला रिऍक्ट कसं व्हायचं, हेच समजत नाही.. एकतर त्या खूप offended होतात आणि मैत्री तोडतात, किंवा मग खूप कांगावा करतात, स्क्रीनशॉट फिरवतात, आणि पाणउतारा करतात.. म्हणून सभ्य पुरुष पण यापासून चार हात दूर राहणेच पसंत करतात..

समजा, एखाद्या मुलानं आपल्या ग्रुपमधल्या एखाद्या मुलीला एखादी सेक्सी कॉम्प्लिमेंट दिली, किंवा व्हाट्सएपवर सेक्सी जोक्स [अलीकडे याला NV messages (non veg jokes) म्हणतात] पाठवले, तर काय होईल? त्याचे कायकाय अर्थ निघू शकतात ?

एक, त्या मुलीला वाटू शकतं की, हा मुलगा/पुरुष मला “आव्हायलेबल” वगैरे समजतो की काय?, किंवा आपण याला सहजपणे ‘पटू’ वगैरे असे वाटतेय की काय? शेवटी, हा ही तसलाच निघाला!!

दुसरं, समोरच्या मुलीबद्दल त्या मुलाला ‘तसं’ काही वाटत तर नाही, पण काय सांगावं, आपल्याकडं बघून ती फसू शकते, आणि आपलं सेटिंग होऊ शकतं.. आणि म्हणून ‘खडा’ टाकून पहिला असेल का त्यानं.. सगळे पुरुष सारखेच!!
( मग ती नाराज वगैरे झाली तर लगेच ‘सॉरी सॉरी’ म्हणायचे, किंवा ‘चुकून सेंट झाला’ वगैरे म्हणायचे हे ओघाने आलेच..)

किंवा तिसरं, समोरची मुलगी आपल्याला काही बोलू शकणार नाही, निषेध (अथवा विरोध) करू शकणार नाही, म्हणूनतर असं नाही ना केलं त्यानं..

पण , या सगळ्यां अर्थां व्यतिरिक्त असे सेक्सी (किंवा एनव्ही) जोक्स शेअर करण्यामागं अजून एक कारण असतं.. जे बऱ्याच मुलींना समजण्याच्या बाहेर आहे..
ते म्हणजे, मुलगा जेव्हा एखाद्या मुलीसोबत खूप ‘कम्फर्टेबल फील’ करतो, आणि ‘ती आपल्याला mis-understand करणार नाही’, असं त्याला वाटतं, तेव्हा केवळ ‘शेअर’ करण्यासाठी किंवा केवळ ‘लाफ्टर ट्रान्सफर’ म्हणून तो असे जोक्स (nonveg but non vulgar jokes) पाठवू शकतो, किंवा अशा प्रकारातल्या कॉम्प्लिमेंट्स देऊ शकतो, कॉमेंट्स करू शकतो..

अर्थात, हे जेंव्हा ती मुलं मुली एकमेकांचे चांगले मित्रमैत्रिण असतात किंवा एकमेकांच्या ‘कम्फर्ट झोन’ मध्ये असतात तेंव्हाच!! उगीच फारशी मैत्री नसताना कोणी जुजबी ओळखीचा मुलगा आगाऊपणा करू लागला, किंवा जवळचा मित्रच पण तो अनोळखी चारचौघात अथवा सोशल वर्तुळात बोलू लागला, तर आपल्या समाजात (ती मुलगी कितीही फ्रँक असेल तरीही) तिला ते आवडणार नाही.. कारण ‘बाकीचे काय विचार करतील’ याचा बराच विचार तिला करावा लागतो!!

त्यामानाने आजच्या युवा पिढीने लैंगिकता ‘स्विकारली’ आहे, आणि त्यातली ‘सहजता’ही स्वीकारायला शिकत आहे.. त्याचे अवडंबर न माजवता ती स्वीकारणे ही काळाची गरज आहे.. ते वैचारिक परिपक्वतेचे ते लक्षण आहे. निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मिळाल्यामुळे असेल कदाचित, पण ते निर्णय ठाम आहेत. या सर्वाचा एकत्रित परीणाम म्हणून सख्ख्या मैत्रिणीला “You are looking hot today” असे कोणताही लैंगिक अभिनिवेष न दाखवता ते म्हणू शकतात. आणि मैत्रीण त्या वाक्यामुळे offended न होता, ते वाक्य ‘as a compliment’ म्हणून स्विकारू शकते.. याचं कारण, ‘तिने Hot दिसण्याचा प्रयत्न करणे’ ही आदिम भावना त्याने समजावून घेतली आहे.. आणि स्वत:च्या शरीराबद्दलचा सार्थ अभिमान तिने जोपासला आहे. (अर्थातच स्वत:च्या मर्यादांची जाणीवही तिथे अपेक्षित आहेच..) त्यामुळेच आपल्या लैंगिकतेचा सहज सुंदर, नैसर्गिक अविष्कार योग्य आणि आपल्या जवळच्या व्यक्तीसमोर करण्यास नवीन पिढीला अडथळा भासत नाही.. एक compliment म्हणून ती लैंगिकता त्यांचा confidence वाढवायला मदत करते. त्यामुळेच लैंगिकतेचा पूर्वीसारखा ‘नको इतका ताण’ आज नवीन पिढीला जाणवत नाही..

काही उच्चभ्रू सोसायटी मध्ये तर फॅमिली ग्रुप्समध्ये किंवा अगदी स्वतःच्या बहिणींसोबत पण अशा कॉम्प्लिमेंट्स देणे आणि असे जोक्स शेअर करणे खूप कॉमन आहे.. आपल्याकडे मध्यमवर्गीयांत सुद्धा बहुतांश वेळा काही चार दोन अगदी जवळच्या मित्रांच्या फॅमिलीज च्या ग्रुप मध्ये पण असे जोक्स शेअर केले जातात.. एकमेकांना सेक्सी कॉम्प्लिमेंट्स दिले जातात.. तसेच आपल्याकडे काही नात्यात पण (जीजू-साली वगैरे) चावट चेष्टामस्करी पूर्वीपासून चालतेच की..! किंवा पूर्वीच्या काही सणसमारंभात काही प्रथांच्या वेळी चावट बोलणे allow असायचे..

जर एक मुलगा आणि मुलगी एकमेकांचे अगदी क्लोज फ्रेंड (not lovers) असतील, किंवा अभ्यासाच्या निमित्ताने किंवा बुक्स, ट्रिप्स, नाटक, डान्स अशा कुठल्यातरी निमित्ताने एकमेकांच्या ‘कम्फर्ट झोन’ मध्ये येत असतील, तर त्यांच्यात अशा जोक्सचे/गप्पांचे/कॉम्प्लिमेंट्सचे शेअरिंग होणं स्वाभाविक आहे..

अलीकडच्या दहा बारा वर्षांपासून मुलामुलींच्या भावविश्वात आणि आजूबाजूच्या परिस्थितीत खूप बदल झालेत.. शाळा कॉलेजेस मध्ये मुलामुलींचे क्लोज ग्रुप असणे, त्यात एकमेकांना सहज शिव्या वगैरे देणे, डबल मिनींग बोलणे किंवा टॉन्टस मारणे, चिडवणे, अश्लील साहित्याची देवाणघेवाण, डिस्कशन, अफेअर, ब्रेकअप या गोष्टी खूप कॉमन झाल्या आहेत.. एक मी पाहिलेले उदाहरण सांगतो. मुलामुलींचा एक ग्रुप एका कॅफेत बसला होता. त्यांच्यात दंगामस्ती चालू होती. समोरच्या रस्त्यावरून एक मुलगी चालत गेली. त्यावर त्या ग्रुपमधील एक मुलगी तिच्या मित्रांना म्हणाली, ‘उसको इतना भी मत घूरो कमीनों, के तुम्हारा खडा हो जाए’..
… आणि ही घटना पुण्यामुंबईत नाही तर एका छोट्या शहरात घडलेली आहे..

आता या वयोगटात आता ह्या गोष्टी खूप कॉमन असल्या (किंवा त्या गोष्टी त्यांच्या दृष्टीने खूप बाऊ करण्याजोग्या नसल्या) तरी जी मागची पिढी आहे, त्या पिढीत याबाबत मात्र अजून अवघडलेपण (awkwardness) आहेच.. दहा-बारा वर्षांपूर्वीच्या पिढीतल्या स्त्रीला आजही (तिला दोन लेकरं झाली असली तरीही) कोण्या जवळच्या मित्राने असे जोक्स पाठवलेले किंवा अशा कॉम्प्लिमेंट्स दिलेल्या आवडत नाहीत.. मग त्यात तिचा ऑफिसमधला कलीग असो, किंवा तिच्या नवऱ्याचा फ्रेंड, किंवा तिचा स्वतःचा फ्रेंडही असो.. तिला ते कॉम्प्लिमेंट्स लाईटली/स्पोर्टिंगली घ्यायला जमत नाही, किंवा अशा जोक्सना रिऍक्ट कसं व्हायचं असतं, हेच तिला कळत नाही..

मग अशा वेळी त्या बिचारीला तिच्या फ्रेंडला अपमान करून झापावं लागतं.. किंवा मग दुसरं काहीतरी रिझन देत पोलाईटली सांगावं लागतं की, ‘अरे माझ्या नवऱ्याला ते आवडत नाही म्हणून तू असे मेसेज नको करत जाऊ..’ वगैरे..

बाहेर व्यवसायानिमित्त किंवा फेसबुक मुळे खूप स्त्रियांच्या पुरुषांशी ओळखी होतात.. त्यातल्या काही ओळखीचे रूपांतर मैत्रीत होते.. अगदी चांगली मैत्री होते.. दोघे जेंव्हा एकमेकांबाबत कम्फर्टेबल फील करत असतील, तर अशा वेळी असे कॉम्प्लिमेंट्स किंवा जोक्सचे मेसेजेस व्हाट्सएप किंवा फेसबुक इनबॉक्स मध्ये आले, तर त्या स्त्रीनं उगीच त्याचा कांगावा अथवा बाऊ न करता या गोष्टी लाईटली घ्यायला हव्यात.. जर तिला त्यात काही चुकीचे निर्देश (fowl suspicion) वाटत असेल, तर समोरच्या व्यक्तीशी तसं स्पष्टपणे बोलायला हवे की,

  • “अरे, तू मला असे जोक्स पाठवायला किंवा अशा कॉम्प्लिमेंट्स द्यायला काही हरकत नाही, (मला ते आवडते/किंवा फारसे आवडत नाही) म्हणून मी वाचून ते डिलीट करत जाईन. जर तू मला तुझ्या ‘कम्फर्ट झोन’ मध्ये समजल्यामुळे असे मेसेज पाठवत असशील तर ठीक आहे, पण यापेक्षा वेगळा अर्थ तुझ्या मनात असेल किंवा त्यामुळे तुझ्या मनात माझ्याबद्दल काही जास्तीच्या अपेक्षा निर्माण होणार असतील तर त्या आत्ताच काढून टाक. या जोक्स मधून निखळ आनंदाची देवाणघेवाण एवढाच उद्देश तू ठेव.. तू माझ्याही कम्फर्ट झोन मध्ये आहेस म्हणून मला तुझ्या उद्देशांबद्दल भीती वाटत नाही, पण पुढे काही कॉम्प्लिकेशन्स होण्यापेक्षा पूर्वकल्पना देणं मी योग्य समजते, म्हणून एवढं सांगणं आलं, राग मानून घेऊ नको.. धन्यवाद!”

(असं डिस्क्लेमर देऊन जर त्या स्त्रीनं आधीच क्लिअर केलं, तर नंतर काही mis-understanding व्हायची शक्यता मावळते.. त्यातलं अवघडलेपण गळून पडतं..)

बरं, एक वेळ ती त्या मित्राच्या उद्देशांबद्दल निश्चिन्त असेल तर तिला काही वावगं वाटणार नाही, ती लाईटली घेऊन एन्जॉय करेलही.. पण तिच्या नवऱ्याला मात्र ते आवडणार नाही.. तोही या गोष्टी तितक्याच लाईटली घेईल याची शाश्वती तितकीच दुर्मिळ!!
तिकडे तोही त्याच्या ग्रुप मैत्रिणींना असे कॉम्प्लिमेंट्स देत असेल अथवा मेसेजेस करत असेल, पण आपल्या बायकोला मात्र तिच्या मित्राचे मेसेजेस आलेले त्याला चालत नाही.. कारण आपल्या भारतात प्रत्येकाला बायको ‘संस्कारी’ पाहिजे असते, पण मैत्रीण मात्र मुक्त विचारांची अपेक्षित असते!!
असो..

पूर्वी पिढी पन्नासेक वर्षाला बदलायची, पण आता दर पाच दहा वर्षालाच बदलते आहे! कालच्या गोष्टी आज पटापट आऊटडेटेड होत आहेत.. दहा वर्षांनंतर कॉलेज ला गेलं की सगळेच ट्रेन्ड चेंज झालेले दिसतात! आणि आपल्या परंपरावादी मनाला चटका बसतो..

इंटरनेट आल्यापासून तर आपल्या हातात स्वयंशिस्त सोडून काहीच उरलं नाहीये.. आत्ताच्या मुव्हीज मधून पण चावट जोक्सचा, शिव्यांचा, आणि डबल मिनींग वाक्यांचा इतका भडिमार होत असतो, की यापासून फार काळ आपण स्वतःला अलिप्त ठेऊ शकणार नाहीये.. ते ऍक्सेप्ट करावेच लागेल.. फक्त मैत्रीतच नव्हे तर एरवीही जितक्या सहजतेने आपण नैसर्गिक लैंगिकता आणि त्यातली ‘सहजता’ त्याचे अवडंबर न माजवता स्वीकारू, तितकं त्याबाबतच्या आपल्या प्रतिक्रियांची तीव्रता कमी होईल आणि आपले त्याबाबतचे ‘अवघडलेपण’ही गळून पडेल.. मग चारचौघात असताना किंवा मुलांसमोर टीव्हीवरच्या पिक्चरमधली शृंगारिक दृश्ये सुरू झाल्यावर चॅनल बदलण्याची वेळ येणार नाही..

मित्रांसोबत शेअर करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *