Dr Sachin Landge's Writing

Dr Sachin Landge's Writings

सरकार म्हणजे काय ?

 

– डॉ सचिन लांडगे.

 

“सरकार” ही एक सिस्टीम आहे जी लोकांनी लोकांसाठी बनवलीय. आरबीआय सीबीआय मिलिटरी पोलीस न्यायव्यवस्था हे सगळे त्या सिस्टीम चे भाग आहेत जे आपल्या भल्यासाठीच आपण बनवलेत.. मग आपण सारेच मिळून कोणाला तरी पाच वर्षांसाठी हे सगळं सांभाळायचं कॉन्ट्रॅक्ट बहुमताने (सर्वानुमते नव्हे) देतो.. हे सांभाळायची इच्छा असणाऱ्या वेगवेगळ्या लोकांनी एकत्र येऊन पक्ष नावाची कंपनी स्थापन केलेली असते. मग ते जाहीरनामा काढतात, आम्ही या पाच वर्षात काय काय करू ते सांगतात, दुसरे इतर कॉन्ट्रॅक्टर (म्हणजेच ‘पक्ष’) किती खराब आहे याचा पाढा वाचतात, आणि पाच वर्षांच्या चौकीदारीचं कॉन्ट्रॅक्ट पदरात पाडून घेतात वगैरे..

कॉन्ट्रॅक्ट मिळाल्यावर जर हे चौकीदार लोकच ह्यातल्या सिस्टीम्सना हाताशी धरून डल्ला मारत असतील, किंवा पुढचं पाच वर्षांचं कॉन्ट्रॅक्ट पण आपल्यालाच मिळावं यासाठी काहीतरी गैर उद्योग करत असतील, किंवा आपल्यासारख्या विचारांचेच कॉन्ट्रॅक्टर लोकांनी नेमावेत यासाठी (शिक्षणव्यवस्थेद्वारे किंवा प्रचारयंत्रणेद्वारे) लोकांच्या विचार जाणिवाच बदलत असतील, तर तो सरळसरळ भ्रष्ट-आचार आहे..

कारण भ्रष्टाचार फक्त पैशांचाच नसतो.. भ्रष्टाचार विचारांचा असतो, जाणिवांचा असतो, भावनांचा असतो.. वैयक्तिक अथवा सामूहिकरीतीने आपल्या किंवा हितसंबंधींच्या आर्थिक/ राजकीय / सामाजिक फायद्यासाठी केलेली कोणतीही अनैतिक कृती म्हणजे भ्रष्ट आचार.. (व्याख्या पुन्हा वाचा.. म्हणजे, ‘माझ्या आवडत्या कॉन्ट्रॅक्टर वर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही’ असं म्हणताना जरा विचार कराल!)
थोडक्यात काय, तर आपली आणि आपल्या पुढच्या पिढ्यांची सोय व्हावी इथपासून ते आपल्या वैचारिक वारसदारांची सोय व्हावी यासाठी वापरले जाणारे सारे अननुकरणिय मार्ग म्हणजे भ्रष्ट-आचार होय..

मग अशा वेळी ‘सरकार’ नावाच्या कॉन्ट्रॅक्टर व्यवस्थेपासून आपल्या देशाचं रक्षण करणाराच खरा देशभक्त असतो..
‘व्यवस्था’ आणि ‘समाज’ यात जो समाजाची बाजू घेतो, तोच खरा देशभक्त असतो.. कारण सरकार म्हणजे देश नसतो, तर समाज म्हणजे देश असतो..

मग त्यात ‘इंदिरा इज इंडिया’ हेही चूक असतं, अन ‘बीजेपी मिन्स पेट्रीओटीझम’ हेही चूक असतं!

– डॉ सचिन लांडगे.

  1. **
मित्रांसोबत शेअर करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *