– डॉ सचिन लांडगे.
अनेकदा हा प्रश्न विचारला जातो की.. लग्न ठरताना ब्लडग्रुप बघायचा असतो का? आणि त्याचा कितपत importance असतो वगैरे..
एक सांगतो, ब्लडग्रुपचा आणि लग्नाचा; पुढे मुलं होण्याचा किंवा न होण्याचा काही एक संबंध नाही..
होणाऱ्या नवरा बायकोचा ब्लडग्रुप एक असला काय किंवा वेगळा वेगळा असला काय, सगळं सारखंच.. पण सध्या त्याचा विनाकारण बाऊ होताना दिसतो आहे.. त्यातून जर मुलीचा ब्लडग्रुप निगेटिव्ह असेल तर मग विचारूच नका..!
काही अतिउत्साही कार्यकर्ते, “पत्रिका जुळविण्यापेक्षा रक्तगट जुळवा” या टाईपची यमक जुळवण्यासाठी विधाने करतात तेंव्हा हसू येते..
काही ज्योतिषीही ‘एक नाड आहे, तेव्हा आता ब्लडग्रुप बघा’, असा शहाजोगपणाचा सल्ला देतात. या नाड या प्रकरणाचा आणि ब्लडग्रुपचा अर्थाअर्थी संबंध नाही. (या सल्ल्यामुळे तो ज्योतिषी आपल्याला जरासा मॉडर्न आणि वैज्ञानिक वाटू शकतो, बस्स!)
निगेटीव्ह ब्लड ग्रुप म्हणजे काहीतरी वाईट असतं असंच् एखाद्याला वाटतं. पण खरं सांगायचं तर हा निगेटीव्हपणा वाईट किंवा धोकादायक नाही. मुळात “निगेटीव्ह” हा शब्द नकारात्मक नाहीये.. काहीतरी वाईट ब्लडग्रुप आहे असा अर्थ अभिप्रेत नाही.. निव्वळ एरवी दिसणारी काही प्रथिनं (antigens) ह्या लोकांच्या रेड ब्लड सेल्स वर नसतात एवढंच… पत्रिकेतल्या ‘मंगळा’इतक्याच ह्याही बाबतीतील अंधश्रद्धाच जास्त आहेत..
यातला मुख्य बाब म्हणजे या Rh-ve व्यक्तींना कधी काळी रक्त भरायची गरज पडली तर ब्लडग्रुप थोडासा दुर्मिळ असल्यामुळे रक्त सहजासहजी मिळत नाही.. हा तोटा अर्थात स्त्री पुरुष अशा दोघांना लागू आहे.. दुसरा तोटा असा की गर्भाचा ब्लडग्रुप जर पॉजिटीव्ह असेल तर आईच्या शरीरात त्या पेशींविरुद्ध रासायनिक अस्त्र तयार होतात आणि ही त्या गर्भाच्या रेड सेल्स विरुद्ध लढा पुकारतात. त्यात गर्भाच्या रेड सेल्स मरतात, गर्भाला अॅनिमिया होतो , कावीळ होते…! वगैरे… (पण त्यावर हि अगदी सहजी उपाय, उपचार आणि लसी आहेत.. त्याला घाबरण्यासारखं आता काहीच उरलं नाही..)
थोडक्यात काय, तर सध्या काही अतिशहाण्यांकडून लग्नाच्या वेळी ब्लडग्रुप पहा, वगैरे गोष्टीचा उगीचच बाऊ केला जातो, पण त्याला तितकंसं महत्व देण्याचं कारण नाही..
– डॉ सचिन लांडगे.