Dr Sachin Landge's Writing

Dr Sachin Landge's Writings

रेमडेसिव्हिरच्या काळाबाजाराच्या निमित्ताने –

 

– डॉ सचिन लांडगे.

 

संकटात सापडलेल्या प्रत्येकाला वाटतं की दुसऱ्याने आपल्याला लुटू नये, पण आपण देखील त्याच माळेतला मणी आहोत का, हे मात्र तो स्वतःत डोकावून बघायचे नाकारतो..

म्हणजे, कोरोनात डॉक्टरने लुटू नये यावर नुकतेच तावातावाने बोलून झालेला भाजीवाला लॉकडाऊन मध्ये भाज्यांच्या भाववाढीचे मात्र समर्थन करतो.. हॉस्पिटल बिलावर तोंडसुख घेऊन झालेला रिक्षावाला अडलेला प्रवासी बघून लगेचच बिनदिक्कतपणे दहा रुपये वाढवतो.. आणि कोरोनात देखील हॉस्पिटल्सनी कमी बिलं घेतली पाहिजे असं वाटणारा प्रत्येकजण हे सोयीस्करपणे विसरतो की, कोरोना वॉर्डमध्ये ड्युटी करायला आरएमओ पासून सिस्टर्स, वॉर्डबॉय, स्वीपर, ते टॉयलेट क्लिनर पर्यंत सगळे दुप्पट तिप्पट पगार देत असाल तरच काम करतो, नाहीतर मी चाललो म्हणताहेत..

कोरोना वॉर्ड किंवा आयसीयु मधल्या दुरुस्तीसाठी बोलावलेले प्लम्बर किंवा मेकॅनिक सरळसरळ पाच-दहा पट पैसे घेताहेत, अन त्यांचेच नातेवाईक ऍडमिट झाले तर (सरकारी नियमांनुसार पैसे घेतले तरी) डॉक्टरने लुटले म्हणून ओरडताहेत..

 

इथं मी डॉक्टर्सच्या किंवा हॉस्पिटल्सच्या लुटीचं समर्थन करतोय असं अजिबात नाही. उलट भुछत्रासारखे उभा राहिलेल्या कित्येक कोव्हीड सेंटर्स मागे जनसेवा किती आणि मनीसेवा किती हे प्रत्येकाच्या लक्षात येतेच आहे..

संकटात देखील पैसे कमवायची संधी शोधणे हे माणसातल्या पशुत्वाचे उदाहरण जरी असले, तरी जोपर्यंत प्रत्येकजणच स्वतःत डोकावून पाहणार नाही, तोपर्यंत याचा कितीही निषेध केला तरी तो निरर्थक आणि एकतर्फीच असेल..

पण तरीही बहुतांश जण “मी नाही त्यातली, अन कडी लाव आतली” अशा पद्धतीने साळसूदपणाचा आव आणताहेत, आणि ते बघणे मोठे मजेशीर आहे..

 

आपल्या देशात काळाबाजार तर बिस्कीट पुड्याचा देखील होऊ शकतो आणि तेही केदारनाथ सारख्या देवाच्या दारात! हे आपण पाहिलंच आहे. पाच रुपयांचा पारलेचा पुडा पाचशेला विकणं आणि पाचशेचा ऑक्सिजन पंधराशेला विकणं, यात तुलनात्मक फरक नाहीच.. असो..

 

जशी तुमच्यावरच्या परिस्थितीचा फायदा घेऊन लुटायला टपलेली गिधाडं असतात, तसं संकटात माणसाची मदत करायला धावून येणारे देवदूत देखील असतात..

आपण फक्त त्यातल्या देवदूतांचं प्रमाण ‘ एक ‘ ने वाढवायचंय… आपली स्वतःची भर टाकून!!

 

– डॉ सचिन लांडगे.

 

**

मित्रांसोबत शेअर करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *