Dr Sachin Landge's Writing

Dr Sachin Landge's Writings

पालकत्वाच्या नोंदी भाग ५ –

 

– डॉ सचिन लांडगे.

 

प्रत्येक मुलाला अन मुलीला स्वावलंबनाचे धडे लहान वयातच दिले पाहिजेत..

पूर्वी फक्त मुलीलाच घरातली कामे शिकवत आणि मुलांना बाहेरची.. पण आता दोघांनाही घरातली बाहेरची असा भेदभाव न करता दोन्ही प्रकारची कामे शिकवली पाहिजेत.

 

प्रत्येक मुलाला अन मुलीला- (जरी घरात नोकर असतील तरीही) खालील गोष्टी करायला लावाव्यात..

 

१. किराणा समान, भाज्या, दूध, धान्य, स्टेशनरी अशा गोष्टी दर महिन्याला साधारणतः किती प्रमाणात लागतात, त्यांचे मोजमापाचे एकके कोणकोणती, त्यासाठी महिन्याला किती खर्च येतो, याची ओळख करून देणे. घरातल्या पैसे व्यवस्थापन यात मुलांना सामील करून घेतल्यास त्यांच्या खर्चाच्या अवाजवी उधळपट्टीवर आळा बसू शकतो.

२. धुणं भिजवणे, कपडे धुणे , वाळू घालणे, इस्त्री अन घड्या करून ठेवणे.

३. कमीतकमी भात भाजी चपाती आणि चहा पोहे करता यावा इतपत स्वयंपाक शिकवणे. झाडून काढणे, दळण आणणे, स्वच्छता ठेवणे, भांडी धुणे आणि किचन मध्ये कुठलं भांडं कुठं असतं याची ओळख करून देणे.

४. लाईटबिल, दुधबिल, पेपरबिल, मोबाईल रिचार्ज, घरपट्टी, पाणीपट्टी, इन्कमटॅक्स, याची ओळख करून देणे.

५. बँकेत पैसे स्लीपच्या साहाय्याने कसे भरावेत अन काढावेत, यासोबतच चेक, डीडी, नेट बँकिंग याची ओळख करून देणे.. जवळजवळ ९९% मुलामुलींना ग्रॅज्युएट झाले तरी बँकेची स्लिपही नीट भरता येत नसते..

६. स्विमिंग डान्स यांच्या क्लास सोबतच (प्राथमिक स्वरूपातली का होईना) इलेक्ट्रिक वायरिंग दुरुस्ती, इलेक्ट्रॉनिक वस्तू दुरुस्ती, गॅस जोडणी, गाडी मेकॅनिक ची कामे व इतर फिटिंग ची कामे शिकवली पाहिजेत..

७. पाणी जपून वापरणे म्हणजे काय काय करावे, वीज गरजेइतकी वापरणे म्हणजे काय याची समज आपल्या कृतीतून देणे. घराची सुरक्षा, सोसायटीचे नियम, आणि कचरा व्यवस्थापन याची ओळख करून देणे.

८. पोस्ट ऑफिस, पोलीस स्टेशन, कोर्ट, सरकारी दवाखाना, बँक, तहसील, सेतू, अग्निशमन, कचरा डेपो, वाचनालय, मार्केट यार्ड, अशा सार्वजनिक जीवनात येणाऱ्या विविध संस्थांना भेटी देणे.

९. मजूर, शेतकरी, चांभार, सुतार, मलनिस्सारण कर्मचारी, प्रकारचे लोक, तसेच अंध अपंग मूकबधिर यांच्या शाळा, वृद्धाश्रम आणि इतर समाजसेवी संस्था यांचे सामाजिक कार्य दाखवून द्यायला मुलांना आवर्जून घेऊन जावे.

१०. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, अठरा वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक मुलास आणि मुलीस पहिलीपासूनचे सगळे नागरिकशास्त्र पुन्हा शिकवावे (आधी ते आपण स्वतः शिकावे!)..

 

या उन्हाळ्याच्या सुट्टीच्या दिवसात अभ्यास किंवा पिकनिक व्यतिरिक्त किंवा स्विमिंग, डान्स, वगैरे क्लासेसच्या व्यतिरिक्त इतर कोणकोणत्या जीवनोपयोगी गोष्टी आपल्याला शिकवता येतील का ते पहा.. कोणी आवर्जून मुलांना या गोष्टी शिकवत असतील तर कॉमेंट्स मध्ये पण लिहा..

 

– डॉ सचिन लांडगे.

 

**

मित्रांसोबत शेअर करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *