Dr Sachin Landge's Writing

Dr Sachin Landge's Writings

टॅक्सच्या नावाखाली लूट –

 

*लाखो रुपयांचे विविध टॅक्स देऊन जर मला कोणतीच सरकारी सेवा वेळेत आणि दर्जेदार मिळणार नसेल तर मी माझे पैसे वाया का घालवावेत.?*

आपण अप्रत्यक्षपणे खूप पैसे टॅक्सच्या रुपात सरकारला (सरकार कोणतेही असो, काँग्रेस किंवा बीजेपी) देत असतो.. सामान्य माणूस रोजच्या जगण्यातून सरकारी तिजोरीत खूप भर टाकत असतो. साधी एक रुपयाची काडेपेटी घेतली तरी आपण सरकारला त्यातला साधारण 20 पैसे टॅक्स देत असतो..

मोबाईल घेतला – टॅक्स दिला..
रिचार्ज केलं – टॅक्स दिला..
लाईट वापरली – टॅक्स दिला..
फोन वापरला – टॅक्स दिला..
टीव्ही फ्रीज काहीही घेतले – टॅक्स दिला..
कार घेतली – रोड टॅक्स दिला..
रोड वर चालवली – टॅक्स दिला..
पेट्रोल टाकलं – टॅक्स आहेच..
गाडी सर्व्हिसिंग केली – टॅक्स दिला..
हॉटेल मध्ये खाल्लं – टॅक्स दिला..
पार्किंग, पाणी, गॅस, अन्नधान्य, कपडे, पुस्तके, गोळ्या औषधं काहीही घ्या – टॅक्स ची भारमार आहेच..

समजा, तुम्ही 2000 बैंकेत ठेवले तर 7% व्याज वर्षाला मिळते म्हणजे 140/- रूपये..
तेच 2000 कर्जाने घेतलेत तर 10 % व्याज वर्षाला बैंकेला मिळते 200/- रूपये..
तेच हौटेल मधे 2000 रूपयाचे खाणे खाल्लेत तर सरकारला 18% जीएसटी लगेच इन्स्टंट मिळतो.. 360/-
*लूट यालाच म्हणतात…*

आपण शेकडो गोष्टी घेतो – कुठं *टॅक्स*च्या स्वरूपात सरकारला पैसे देतो, कुठं *फी* देतो, कुठं *बिल* देतो, कुठं *व्याज* देतो, कुठं *दंड* म्हणून तर कुठं *लाच* म्हणून आपल्याला पैसे द्यावे लागतात..
आणि या सगळ्यानंतर तुमच्या कमाईतून पण सरकारला पैसे द्यायचे.. कमाईच्या 10 ते 30 टक्क्यांपर्यंत इन्कम टॅक्स सरकार घेणार..!!

*…आणि या सगळ्या ड्राम्यानंतर आपल्याला काय मिळतं?*

*सोशल सेक्युरिटी* नावाची गोष्ट शून्य आहे आपल्याला..
आपले सेवक असणारे पोलीस अन् नेते कसे वागतात आपल्याशी माहिती असेलच्..!

आपल्यावर काहीही प्रसंग आला तर आपल्या स्वतःलाच निस्तारावा लागतो तो.. सरकारी मदतीची कसलीही शाश्वती नाही.. उलट सरकारी यंत्रणांशी भिडताना नाकी नऊ येते माणसाच्या..

सोशल सिक्युरिटी नाही, चांगली वैद्यकीय सुविधा नाही, चांगल्या सरकारी शाळा नाहीत, चांगली पब्लिक ट्रान्सपोर्ट नाही.. रस्ते खराब, स्ट्रीट लाईट खराब, हवा खराब, पाणी खराब, भाज्या आणि फळं खराब, रेशनचं धान्य भेसळयुक्त, आणि वर दरवर्षी महागाई वाढतेच आहे.. अचानक खर्च आणि इमर्जन्सी आहेच.. आणि प्रत्येक ठिकाणी लाईन लागलेली आहेच..

आपण इन्व्हर्टर किंवा जनरेटर का घेतो, कारण सरकार आपल्याला 24 तास वीज द्यायला असमर्थ आहे..
आपण सबमर्सिबल पंप का बसवतो, बोअर का घेतो, कारण सरकार आपल्याला 24 तास पाणी द्यायला असमर्थ आहे..
आपण मुलांना महागड्या शाळेत का घालतो, कारण सरकारी शाळेत चांगलं शिक्षण नाही..
आपण सेक्युरिटी गार्ड का ठेवतो, कारण सरकार आपल्याला सुरक्षित जीवन द्यायला असमर्थ आहे..
आज आपल्या घरातल्या प्रत्येकालाच गाडी का लागते, कारण स्वस्त आणि सोयीची पब्लिक ट्रान्सपोर्ट सरकार देऊ शकत नाही..

सगळीकडे माझेच पैसे जाणार, सगळीकडे माझी सोय मलाच करावी लागणार असेल, तर मग का द्यावा मी सरकारला इतका टॅक्स? कशासाठी.?
*आयुष्यभर टॅक्स देऊन, माझ्या आयुष्याच्या शेवटी माझी कमाई बंद झाली, तर सरकारकडून मला काय मिळणार आहे म्हणून मी आज पैसे देत राहावं?*

इथले व्यावसायिक 2 ते 10 टक्क्यांच्या मार्जीनमध्ये नफा घेतात, पण सरकारला मात्र मी माझ्या कष्टाच्या कमाईतले सरळसरळ 30% का द्यावे?

असो… इतर टॅक्स न देणं माझ्या हातात नाही, पण इन्कम टॅक्स देणं मात्र माझ्या हातात आहे. आणि मी तो बरोबर नाही भरला तर तुम्ही मला “टॅक्स चोर” म्हणाल.. पण ही टॅक्स चोरी नाही; हि *”टॅक्स सेव्हिंग”* आहे..

*मला सरकारकडून काहीच दर्जेदार मिळत नाही म्हणून मी ते टॅक्समधून वाचविलेले पैसे वापरून खाजगी क्षेत्रांकडून मिळवितो..*

*जर सरकार मला रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य आणि इतर सेवा चांगल्या देणार असेल, सोशल सेक्युरिटी देणार असेल, तर मी आनंदाने माझा पूर्ण इन्कम टॅक्स भरायला तयार आहे..*

भरमसाठ टॅक्स देऊन जर मला कोणतीच सरकारी सेवा वेळेत आणि दर्जेदार मिळणार नसेल तर मी माझे पैसे वाया का घालवावेत.?

– डॉ सचिन लांडगे.
————————-

सोबत दोन बिलं जोडलीत. एक हॉटेलचं आणि एक मोबाईलचं बिल आहे. त्यात टॅक्स च्या नावाखाली किती पैसे मी हकनाक मोजलेत पहा.. 650 रुपये बिलावर चक्क 204 रुपये टॅक्स म्हणून घ्यायचे हे कसं ठरवलं सरकारनं.?
————————-

 

मित्रांसोबत शेअर करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *