Dr Sachin Landge's Writing

Dr Sachin Landge's Writings

आग जलनी चाहीए —

– डॉ सचिन लांडगे.

 

‘बदल’ हा अपरिहार्य आहे ..

 

कशातला बदल? तर, आधी स्वतःतला बदल.. आपल्या विचारातला बदल, आपल्या कृतीतील बदल, आजूबाजूच्या परिस्थितीतील बदल.. सामाजिक बदल.. जगण्याच्या आयामातला बदल.. भाषा, संस्कृती, मान्यता, संकेत आणि एकूण जीवनमानातला बदल..

 

पण हा ‘बदल’ कोणामुळे होतो?

 

आयुष्य मागील पानावरून पुढे चालू ठेवणाऱ्यांमुळे?

दिवसाला दिवस जोडत खाली मान घालून मुकाट जगणाऱ्यांमुळे?

समाजाला मान्य असलेलं चाकोरीबध्द आयुष्य जगणाऱ्यांमुळे?

 

यातल्या कोणामुळे होतात बदल ?

 

बदल होतात ते,

व्यवस्थेच्या चौकटीला धडका देणाऱ्या आणि कुठल्याही गटात न बसणाऱ्या लोकांमुळे..

 

समाजसंकेतांच्या चाकोऱ्यांची भीड न बाळगणाऱ्या निर्भीड लोकांमुळे..

 

ज्यांच्या बुद्धीचा आवाका, शारीरिक कुवत, इच्छाशक्तीचा जोर आणि अंगातले किडे ज्यांना स्वस्थ बसू देत नाहीत, अशा अवलिया लोकांमुळे..

 

तुम्ही ठरवा तुम्हाला कोण व्हायचंय ?

 

‘ठेविले अनंते तैसेची रहावे’ असं म्हणत आणि मुंगी होऊन साखर खात, आयुष्याचं प्रत्येक पान ‘मागील पानावरुन पुढे चालू..’ करणारे होणार.. की चौकटी आणि चाकोऱ्यांबद्दल आवाज उठवणारे परिवर्तनाचे शिलेदार होणार?

 

मी एकटा काय करू? माझ्या एकट्याच्या विचाराने काही बदलणार नाही.. “कुछ नहीं बदलेगा यहां” असे म्हणू नका कृपया..

 

कारण, बदल हि लगेच घडणारी क्रिया नाही.. ती वर्षोनुवर्षे चालणारी प्रोसेस आहे..

 

फ्रेंच राज्यक्रांती पहिल्या दिवसापासून तलवारींनी नाही लढली गेली. तिची सुरुवात आधी लोकांच्या मनामनांत झाली.. लोक बोलू लागले, लोक चर्चा करू लागले, लोक एकत्र येवू लागले, आणि चौकाचौकातून सुरुवात होत एक दिवस राजसत्ता उलथवली गेली..

 

तुमचे एकट्याचे वेगळे विचारही या बदलाच्या प्रोसेसमध्ये तितकेच महत्वाचे असतात..

 

कोणत्याही सामाजिक प्रश्नांवर लिहिणे, अथवा राजकीय पक्षांविषयी लिहिणे किंवा आजूबाजूच्या न पटणाऱ्या आणि डोक्यात जाणाऱ्या ‘अ’व्यवस्थेबद्दल लिहिणे, हे माणूस जिवंत असल्याचेच लक्षण आहे.. फँड्री मध्ये जब्या ने भिरकावलेला दगड केवळ संवेदनशील माणसालाच लागू शकतो..

 

म्हणून केवळ ‘तो टिकाच जास्त करतो’, किंवा ‘तो कायम निगेटिव्हच लिहीत असतो’ या शेऱ्यांपुरतेच या तळमळीकडे न पाहता, “तो तुमच्या मनात अव्यवस्थेविरुद्ध ठिणगी पेटवायचा प्रयत्न करतोय” अशा दृष्टीने पाहायला शिकणे, हीच बदलाची एक सुरुवात आहे..

 

म्हणून.. बोला, लिहा, वाचा, विचार करा, विचार पसरवा.. हळूहळू का होईना बदल होतात.. बदल होतातच..

 

सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं,

मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए।

 

मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही,

हो कहीं भी आग, लेकिन आग जलनी चाहिए।

 

– डॉ सचिन लांडगे.

 

**

मित्रांसोबत शेअर करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *